पेट्रोल- डिझेल दराचा नवा उच्चांक
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे. सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे. सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय. पेट्रोल ३८ पैशांनी तर डिझेल ४७ पैशांनी महागलंय. मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८७.७७ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर ७६.९८ रुपये नागरिकांना मोजावे लागतायत.
सध्या इंधन दरवाढीचा भडका उडालाय. मात्र महानगरांपेक्षा परभणीत सध्या पेट्रोलचे दर नव्वदीच्या जवळ पोहोचलेत. परभणीत पेट्रोलचे दर ८९ रुपये ४७ पैसे प्रतिलिटर इतके झालेत. तर डिझेल ७७ रुपये ४३ पैसे प्रतिलिटर इतके आहेत.
मराठवाड्यात इंधन पुरवठा करणारा एकही डेपो नसल्याने परभणी शहराला साडेतीनशे किलोमीटर दूर असलेल्या मनमाड डेपोवरून इंधन पुरवलं जातं. त्यामुळे या वाहतुकीचा खर्च सर्वसामान्य परभणीकरांच्या खिशातून काढला जातोय.