COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : ज्या कलाकाराने सर्कसमधील मुक्या जनावरांना आपल्या सुरांच्या जादूने नाचवले होते तोच सुरांचा जादूगार मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात खितपत पडला होता... त्याला कुटुंबीयांच्या भेटीची आस लागली होती. मात्र या कलाकाराला जिवंतपणी रुग्णालयातून न्यायला कुणी आलंच नाही... आणि आले तेव्हा फार उशीर झाला होता.


वादळात अडली माझी नाव रे...


नौका माजी किनाऱ्याला लाव रे...


खरंच कमलेश कांबळेंच्या शेवटच्या क्षणी त्यांना किनाराच सापडला नाही... ज्या कलाकारानं हे सुंदर गाणं लिहिलं, त्याच कलाकाराच्या नशिबी अशी परिस्थिती यावी, याहून दुर्दैवी ते काय... कमलेश कांबळे एक उमदा कलावंत... उत्तम पियानो वादक... सर्कसमध्ये पियानोच्या तालावर ते जनावरांचे खेळ करायचे... अनेक नवोदित कवींची गाणी त्यांनी संगीतबद्ध केली. याच कमलेश कांबळेचं घाटकोपरमधल्या राजावाडी रुग्णालयात १० जुलैला निधन झालं. ते रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्यावर उपचारही झाले होते, पण त्यांना त्यांच्या मुलानं किंवा नातेवाईकांनी घरीच नेलं नाही. अखेर कांबळे यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. 


कमलेश कांबळेंसारखे अनेक रुग्ण कुठल्याही आधाराशिवाय राजावाडी रुग्णालयात असल्याची बातमी 'झी २४ तास'ने दाखवली होती. पण वाद असल्यानं कांबळेंना घरी नेणार नाही, असं त्यांच्या मुलानं सांगितलं होतं. 


कमलेश कांबळेंचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी त्यांचं पार्थिव ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले... पण वडील जिवंत असताना घरात नको होते... कमलेश कांबळेंचा मृत्यू हे उसवत चाललेल्या नात्यांचं, संपत चाललेल्या माणुसकीचं हे अंगावर काटा आणणारं उदाहरण... एका कलावंताची अशी भरकटलेली नाव चटका लावून गेली...