पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्र्याना फोन, राज्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा
बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे
मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. कोकणात तर पावसाचा हाहाकार सुरू आहे. चिपळूण आणि खेड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफचं एक पथक चिपळूणमध्ये दाखल झालं असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे.
महाराष्ट्रातील पुरपरिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन परिस्थितिचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे, त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
'परिस्थितीशी सामना करताना शक्य तितकी सर्व दिली जाईल, प्रत्येक जण सुरक्षित राहावा यासाठी प्रार्थना करत आहे' असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
कोकणात पावसाचा हाहाकार
चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे. वशिष्ठी,शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अतिशय भयावह स्थिती त्याठिकाणी उद्भवली आहे. चिपळूणमध्ये मदतकार्याला सुरुवात झालीय. घरांमध्ये अडकलल्या नागरिकांना बोटीनं बाहेर काढण्यात येतंय.