PM Modi To Visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. देहूतील श्रीसंत तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. तर मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा असणार पंतप्रधानांचा कार्यक्रम
20 जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.  संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे.


पंतप्रधान मोदी यांचं दुपारी 1.10 वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. 1 वाजून 45 मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल. 


संत तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी येथे भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. 


कडेकोट पोलीस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठीच्या पार्श्वभूमवीर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  देहूत बंदोबस्तासाठी 10 पोलीस उपायुक्त, 20 सहायक पोलीस आयुक्त, 25 पोलिस निरीक्षक, 295 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 2 हजार 270 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत