मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातल्या कोरोनासंदर्भातल्या स्थितीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा ३२वर पोहचला आहे. देशात कोरोना बाधितांच्या संदर्भात ३२ रुग्णांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.  




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालयं, मॉल्स, जीम, सिनेमागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. या नियमाचं पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येण्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


तसंच, रेल्वे, बेस्टकडूनही योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा देशभरातला वाढता फैलाव लक्षात घेता रेल्वेने एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स, उशा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना येईपर्यंत, हे पडदे, उशा, ब्लँकेट्स काढण्यात येणार असून प्रवाशांनी या वस्तू स्वत: आणण्याबाबत रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये फिनाईलने साफसफाईही करण्यात येत आहे.


कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.