रश्मी ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचा फोन
रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या HN रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यासंदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या HN रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कोविड संसर्गाची लागण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनकरून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.'
रश्मी ठाकरे यांना 23 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
आदित्य ठाकरेंनाही कोरोना
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य यांनी स्वत: 20 मार्च रोजी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.
यानंतर त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रश्मी ठाकरे यांची विचारपूस करण्यास फोन केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.