मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशिक्षित व अडाणी म्हणणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. ते गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपचे नेते हे सध्या अतिसंवेदनशील झाले आहेत. प्रत्येक वाक्यावर किंवा गोष्टीवर त्यांचा आक्षेप असतो. हे खूपच जाचक आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणे क्रमप्राप्त आहे. लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान म्हणजे काही देव नसतो. त्यामुळे मर्यादा पाळून लोक त्यांच्यावर टीका करु शकतात, असे निरूपम यांनी म्हटले. 


मी वापरलेले शब्द कोणत्याहीप्रकारे असंसदीय नव्हते. उद्या शाळांमध्ये खरंच पंतप्रधान मोदींवरील लघुपट दाखवला आणि एखाद्या विद्यार्थ्याने पंतप्रधानांचे शिक्षण किती आहे?, असे विचारले तर काय कराल? देशाच्या पंतप्रधानांचे शिक्षण किती झाले आहे, ही बाब नागरिकांना माहिती नाही. ही गोष्ट खूपच लज्जास्पद म्हणावी लागेल. अशा परिस्थितीत आमच्यासारखे लोक प्रश्न विचारणारच. ती एकप्रकारची अभिव्यक्ती आहे, नाराजी आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. त्यामुळे भाजपमधील बुद्धिवाद्यांनी याला उगाच नकारात्मक स्वरुप देऊ नये, असे निरुपम यांनी सांगितले.