मुंबई : पीएमसी बँक खातेदाराचा मृत्यू झाला. संजय गुलाटी असे मृत खातेदाराचे नाव आहे. सोमवारी मुंबईत किला कोर्टासमोर झालेल्या रॅलीनंतर संजय गुलाटी अंधेरी पश्चिमेतील घरी गेले. जेवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्यांना तात्काळ कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. संजय गुलाटी जेट एअरवेजचे कर्मचारी होते. मात्र त्यांचं काम थांबवण्यात आले होते. त्यातच बॅंकेत पैसे अडकल्याने ते त्रस्त होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकेत गैरव्यवहार झाल्याने रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले.  त्यामुळे सगळ्याच खातेदारांना आणि  ज्यांचे बॅंकेत पगार व्हायचे त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली. त्यानंतर सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिवसाला केवळ १००० रूपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. तेव्हा रिझर्व्ह बँकेने पहिल्या टप्प्यात ही मर्यादा १० हजार आणि त्यानंतर २५ हजारापर्यंत वाढवली होती. परंतु, तरीही खातेधारकांच्या अडचणी कमी झाल्या नव्हत्या. 


दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुंबईत आल्या असताना संतप्त खातेधारकांनी त्यांच्यासमोर निदर्शनेही केली होती. त्यावेळी निर्मला सीतारामण यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. त्यामुळे आता खातेधारकांना दिवसाला बँकेतून ४० हजार रुपये काढता येतील. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार इतकी होती.


काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळे पीएमसीला रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नव्हती. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता आणि संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे.