मुंबई : येथील आझाद मैदानावर पीएमसी खातेधारकांनी आजपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत आरबीआय स्वत: चर्चा करणार नाही, तोपर्यंत आझाद मैदानावर प्रदर्शन सुरुच राहील, असा पावित्रा आंदोलकांनी घेतलाय. दरम्यान ३० ऑक्टोबरपर्यंत आरबीआय गव्हर्नरला भेटून निर्णय घेऊ, असे आश्वासन आरबीआयच्या कार्यकारी संचालकांनी दिले होते. मात्र, आजपर्यंत आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे खातेदार आंदोलक संताप व्यक्त करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सर्व खातेदारांनी मुंबईच्या बीकेसीतील आरबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आयुष्याची कमाई हातातून निघून गेल्याने पीएमसी खातेधारक हवालदिल झालेत. पैसे कधी मिळतील या चिंतेने पीएमसी खातेधारकांची दिवाळी अंधारात गेली आहे. आरबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. खातेदारांनी पीएमसी बँकेच्या बंदीविरोधात घोषणाबाजी करीत रस्त्यावर बसले होते. दरम्यान, खातेदारांचे एक शिष्टमंडळ आरबीआय अधिकाऱ्यांशी  बोलण्यासाठी गेले. दोन तास बैठक झाली. आरबीआयने पीएमसी बँकेच्या खातेदारांना काही आश्वासन दिले होते. मात्र, आजचे आश्वासन आरबीआयने पाळले नसल्याचा आरोप बँक खातेधारकांनी केला आहे. दरम्यान, आता आरबीआयचे अधिकारी ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल, असा इशारा खातेधारकांनी दिला आहे. 


पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक गैरव्यवहारामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. या बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. अर्थात १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेत पैसे अडकल्याने आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे.