बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झालाय. मुरलीधर धारा असं या खातेदाराचं नाव आहे. ते मुलुंडमध्ये राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मुरलीधर धार यांच्याकडे पैसेही होते... परंतु, इतर सर्व सामान्यांप्रमाणेच त्यांचे पैसेही त्यांना बँकेच्या विश्वासावर पीएमसी बँकेत भरले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर उपचारासाठीचे पैसे असूनही केवळ ते बँकेत अडकल्यानं धारा यांची शस्रक्रिया लांबणीवर पडली. यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुरलीधर धारा हे ८० वर्षांचे होते.  



मुरलीधर धारा आणि त्यांचा मुलगा प्रेम धारा या दोघांचंही पीएमसी बँकेत खातं होतं आणि खात्यात पैसेही होते. परंतु ते वेळीच हातात न आल्यानं प्रेम यांना आपल्या वडिलांना गमवावं लागलंय. 


पंजाब ऍन्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आलेत. पीएमसी बँकेतील ही १७ लाख खाती नाहीत तर ही १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुरलीधर धारा हे पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचे तिसरे बळी ठरलेत. याअगोदर फटतो पंजाबी आणि संजय गुलाटी या दोन खातेधारकांचा तणावामुळे मृत्यू झालाय. तिसऱ्या मृत्युमुळे खातेधारकांमधील रोष आणखी वाढला असून अजून किती बळी बँक आणि प्रशासन घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे.