पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील भयंकर प्रकार... निष्काळजपणामुळे विद्यार्थ्याचा बळी
Poddar Ayurvedic College Student Death : मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायात निष्काळजीपणाचा प्रकार पुढे आला आहे. BAMS ला शिकणाऱ्या धाराशिव येथील विद्यार्थ्याला हॉस्पिटलमधील सेवा न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
Poddar Ayurvedic College Student Death : मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील भयंकर प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजपणामुळे पोद्दार महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. दरम्यान, जाब विचारत विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल ओपीडी बंद केली आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.
मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये BAMS ला शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे (22) या विद्यार्थ्याला त्याच हॉस्पिटलमधील सेवा अभावी आणि तत्परता दाखवली नसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. रात्री झाडावरुन पडून त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. मात्र या विद्यार्थ्यावर वेळत उपचार मिळू शकलेले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या विद्यार्थ्याचा जीव गेला आहे, असा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झालेत. त्यांनी रुग्णालयावर धडक मारली.
दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आरोप केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात मुले सुरक्षित नसल्याचे सिद्ध होत आहे. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांच्यामध्ये असंतोष असून डिन यांनी त्या जखमी विद्यार्थ्यांसाठी साधी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली नाही. तसेच उपचारासाठी त्याला स्पर्श देखील केला नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने या विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
सकाळपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन
सकाळी आठ वाजल्यापासून इथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. मृत पावलेल्या दयानंद काळे या विद्यार्थ्याला आर्थिक मदत देण्यात यावी त्यासोबत या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी दयानंद काळे यांच्या सहकारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली होती. या संपूर्ण आंदोलनामध्ये कॉलेजचे बाहेरचे विद्यार्थी देखील सामील झालेले होते. त्या विद्यार्थ्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलन करता बसलेल्या विद्यार्थी महाविद्यालय प्रशासनासोबत केलेल्या चर्चेतून मार्ग निघालेला आहे. या घडलेल्या घटने संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. त्या कमिटीद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे आणि दोषींवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचा आश्वासन महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतले आहे.
एक प्रतिष्ठित शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय
आर ए पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या नावाने प्रसिद्ध असलेले हे महाविद्यालय 1941 मध्ये स्थापन झाले आहे. RAPAMC मुंबई हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संलग्न आहे आणि केंद्रीय भारतीय औषध परिषदेने मान्यता दिली आहे. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय भारतातील आयुर्वेदासाठी सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्राधान्य असते. येथे चांगल्या सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत.