धक्कादायक : महिना अडीच लाखांची नोकरी सोडून त्यानं सुरू केलं `चेन स्नॅचिंग`
पोलिसांनी या दोघांकडून लुटलेली कार, मोबाईल फोन सोन्याची चेन असा सर्व मुद्देमाल हस्तगत केलाय
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : वाशी पोलिसांनी एका नामांकित कंपनीत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सुमीत सेनगुप्ता याला अटक केलीय. ३५ वर्षांच्या सुमीतला क्रेटा कारची चोरी तसेच चेन स्नॅचिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमीतकडून लुटलेली कार, सोन्याची चेन आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सुमीत सेनगुप्ता याच्यासोबत नितीन अग्रवाल (२५ वर्ष) यालादेखील अटक केली आहे.
अंमली पदार्थांच्या आहारी
या प्रकरणात अटक करण्यात आलेला सुमीत सेनगुप्ता हा पाच वर्षापूर्वी एका नामांकित आयटी कंपनीमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्याला तब्बल अडीच लाख रुपये दरमहा पगारदेखील होता. मात्र कौटुंबिक कारणावरुन सेनगुप्ता याच्या पत्नीने त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात छळवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर सुमीतने त्या कंपनीतून राजीनामा दिला होता. त्यानंतर कामधंदा नसल्यामुळे दैनंदिन खर्च चालवणेदेखील सुमीतला कठीण झाले होते. अशातच तो अंमली पदार्थाच्या आहारी गेला होता.
पोलिसांनी असा लावला प्रकरणाचा छडा
सुमीत सेनगुप्तानं ९ डिसेंबर रोजी वाशीतील फोर्टीस हॉस्पीटलजवळ नवी कोरी क्रेटा कार घेऊन उभ्या असलेल्या कार चालकाला पिस्तुल असल्याचा बनाव करत एका लोखंडी वस्तूच्या साहाय्यानं धमकावत कारचा ताबा घेतला होता... त्यानंतर सुमीतने कार चालकाजवळ असलेली रोख रक्कम आणि त्याचे दोन मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी, कार चालकाला वाशी सेक्टर-१२ मध्ये रस्त्याच्या बाजुला कारमधून ढकलून दिलं होतं.
याबाबत वाशी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरु केला होता. त्यानंतर तीन दिवसांनी सुमीत सेनगुप्ता व त्याचा सहकारी नितीन अग्रवाल या दोघांनी लुटलेल्या कारमधून वाशी सेक्टर-२९ मध्ये एका महिलेच्या अंगावरील सोन्याची चेन लुटून पलायन केल्याचं समोर आलं होतं. यावेळी या दोघांनी घाबरलेल्या महिलेलाही चेनसोबत काही अंतर फरफटत नेलं होतं.
सीसीटीव्हीची मदत
वाशी पोलिसांकडे या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपीला धुंडाळून काढलं. त्यांच्या तपासणीत क्रेटा कार लुटून नेणारा व चेन स्नॅचिंग करणारा आरोपी हा एकच असल्याचं समोर आलं. त्यानुसार वाशी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक विकास गायकवाड यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळालेल्या आरोपीची माहिती मिळविली असता आरोपी सुमीत सेनगुप्ता याला वर्षभरापूर्वी त्याला पिस्तुल चोरी प्रकरणात वाशी पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचंही समोर आलं. त्यानुसार वाशी पोलिसांनी सुमीत सेनगुप्ता याचा शोध घेऊन त्याला वाशी सेक्टर-९ मधील गार्डनजवळ क्रेटा कारमधून फिरत असताना अटक केली. सुमीतच्या उलट तपासणीत नितीनचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून लुटलेली कार, मोबाईल फोन सोन्याची चेन असा सर्व मुद्देमाल हस्तगत केलाय. न्यायालयाने या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती वाशी पोलिसांनी दिलीय.