दादर स्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या नकली टीसीला अटक
मुंबईकरांनो नकली टीसीपासून सावधान...!
सचिन गाड, मुंबई : मुंबईत लोकलनं प्रवास करत असाल आणि एखाद्या टीसीनं तुम्हाला थांबवलं तर त्याला तिकीट दाखवा. पण तो खरा टीसी आहे ना, याची खात्री नक्की करुन घ्या. मुंबईच्या दादर स्थानकात टीसी असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुबाडणाऱ्या विनायक पांडे याला अटक करण्यात आली आहे. एका प्रवाशाला लुबाडताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात एका टीसीने सचिन म्हात्रे या व्यक्तीला अडवलं आणि त्यांच्याकडे तिकीटाची विचारणा केली. पण म्हात्रेंना संशय आला आणि त्यांनी टीसीकडेच ओळखपत्र मागितलं. पण त्याच्याकडे ओळखपत्र नव्हतं. मुंबईच्या लोकलमध्ये अशा प्रकारे टीसी किंवा पोलीस असल्याचा बनाव करून प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांनो, सावध राहा.