दिल्ली हिंसाचाराचे मुंबईत पडसाद, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी हटकले
जमावबंदीचं उल्लंघन होत असल्याचं सांगत पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एशियाटीक लायब्ररी परिसरात सीएए विरोधक एकत्र येणार होते. रात्री ११ च्या सुमाराला इथे आंदोलन करण्याचं नियोजन होतं. मात्र मुंबई पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त लावत हे आंदोलन होऊ दिलं नाही.
एशियाटीक सोसायटी परिसरात एकत्र येण्याचा मेसेज दिवसभर व्हायरल झाला होता. रविवारीही गेट वे परिसरात एकत्र येऊन आंदोलन करण्याचा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र तो प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला होता.
काल रात्रीही आंदोलक जमण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जमावबंदीचं उल्लंघन होत असल्याचं सांगत पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या हिंसाचाराने मंगळवारी अधिक उग्र रुप धारण केले. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीच्या काही भागांमध्ये पोलिसांकडून शुट एट साईटचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या सोशल मीडियावर यमुना विहार येथील नूर ए इलाही चौकातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांकडून शुट एट साईटचे आदेश देण्यात आल्याची घोषणा होताना दिसत आहे. लोकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश आहेत. त्यामुळे लोकांनी घरात राहावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी (२४ फेब्रुवारी ते २४ मार्च) जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच काहीवेळापूर्वीच दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एसएन श्रीवास्तव यांची विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिल्याचे समजते.