मुंबई : मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसे विरुद्ध संजय निरुपम संघर्ष चांगलाच पेटला आहे. मालाड पोलिसांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवानगी न घेता सभा घेणे आणि भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर मनसे पदाधिका-यांनी निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे आणि कॉंग्रेस समोरासमोर उभे ठाकलेत. फेरीवाल्यांविरोधात मनसेनं कडक भूमिका घेतल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची पाठराखण करतानाच त्यांच्यासाठी आपण लढा देणार असल्याचं सांगितलं आहे.


मालाड स्टेशन बाहेर निरुपम यांनी सभा घेत फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई अवैध असल्याचं ते म्हणाले. फेरीवाल्यांसाठी संरक्षण कायदा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी करत, मनसे आणि बीएमसी ज्या पद्धतीने फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत, ती थांबवण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे. तसेच सरकारला शहरात हॉकिंग झोन नियमीत करण्याची इच्छा नाही. कारण असं केल्यास त्यांचे हप्ते बंद होतील, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.