कपिल राऊत, ठाणे :  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण झालेल्या तरुणाची भेट घेण्यासाठी निघालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी मुलुंड टोल नाक्यावर अडवले. जिल्हा बंदी असल्याचं कारण देत पोलिसांनी दोन्ही नेत्यांना रोखलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावरून अनंत करमुसे या ठाण्यातील तरुणानं अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी दिवे लावण्याचं आव्हान केलं होतं. त्याची आव्हाड यांनी खिल्ली उडवली होती. त्यामुळे अनंत करमुसे याने आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकला होता.


आव्हाड यांनी या तरुणाला पोलिसांकरवी बंगल्यावर बोलावले आणि त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी अनंत करमुसे याला अमानुष आणि बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे भाजपनं या मुद्यावर आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. आज राज्यपालांच्या भेटीतही भाजपनं आव्हाड यांच्यावर कारवाईचा मुद्दा उचलून धरला होता.


दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सकाळी अनंत करमुसे याची भेट घेण्याचं ठरवलं होतं. पण पोलिसांनी त्यांना घरीच रोखल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. आज संध्याकाळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत सोमय्यादेखिल करमुसेच्या भेटीसाठी निघाले होते.


 



मुलुंड टोलनाक्यावर पोहचताच दरेकर आणि सोमय्या यांना पोलिसांनी रोखले. लॉकडाऊन आणि जिल्हाबंदीचं कारण देऊन पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना टोलनाक्यावर अडवले आणि ठाणे जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून रोखले. त्यामुळे दोन्ही नेत्यांना अखेर टोलनाक्यावरून परतावे लागले.