मराठा मोर्चा: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर मोठा पोलीस बंदोबस्त
टोल नाक्यावर पोलीस तैनात
मुंबई : मुंबईत मराठा संघटनांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दहीसर टोल नाक्यावर पोलिसांचा मोठा फाटा सकाळीच तैनात करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा संघटनाचे कार्यकर्ते रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन टोल नाक्यावर मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई बंदमधून शाळा आणि महाविद्यालयं वगळली असली तरी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पोलीस आणि प्रशासन घेईल अशा सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती पाहून प्रशासन याबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतंय. तर या बंदसाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.