मैदानावरचा चित्रपटाच्या गाड्यांचा `बाजार` पोलिसांनी उठवला!
परळ येथील सेंट झेवियर्स फुटबॉल मैदानावर अनधिकृतरित्या पार्कींग केलेल्या चित्रपट शुटींगच्या गाड्या महापालिकेने स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केल्यानंतर हटविण्यात आलेल्या आहेत.
मुंबई : परळ येथील सेंट झेवियर्स फुटबॉल मैदानावर अनधिकृतरित्या पार्कींग केलेल्या चित्रपट शुटींगच्या गाड्या महापालिकेने स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केल्यानंतर हटविण्यात आलेल्या आहेत.
काल रात्री या गाड्या मैदानातून हटविण्यात आल्या. बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राधिका आपटे यांच्या 'बाजार' या चित्रपटाचे शुटींग मैदानाजवळ असलेल्या रतन सेंट्रल इमारतीत ६ जूनपासून सुरु आहे. त्या चित्रपट युनिटच्या या गाड्या होत्या. त्यात व्हनेटी व्हॅन्सचाही समावेश होता.
मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी मैदानात येणाऱ्या स्थानिकांना या गाड्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. दरम्यान 'झी चोवीस तास'ने काल सेंट झेवियर्स फुटबॉल ग्राउंडचा सुरु असलेला गैरवापर आणि इथे खेळाडूंना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचे वृत्त दाखवले होते. त्यानंतर महापलिका आणि पोलीस यंत्रणा स्तरावर कारवाईला वेग आला.
दरम्यान, भाजप प्रणित चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी 'बाजार' चित्रपटाचे शुटींग आंदोलन करून बंद पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर शुटींग सुरु रतन सेंट्रल इमारतीखाली पार्कींग करण्यात आलेल्या चित्रपट युनिटच्या गाड्या भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना हटविण्यास भाग पाडले. तसेच MDFA च्या ताब्यात असलेले सेंट झेवियर्स फुटबॉल ग्राऊंड महापालिकेने पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केलीय.