राज्यात राजकीय घडामोडींना वेग, वळसे पाटलांची शरद पवारांशी चर्चा, चर्चेचा तपशील सांगण्यास गृहमंत्र्यांचा नकार
Sharad Pawar यांच्या उपस्थितीत गृह विभागाशी संबंधित विषयांवर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खलबतं
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत गृह विभागाशी संबंधित विषयांवर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खलबतं झाली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यावेळी उपस्थित होते. पोलीस बदल्यांबाबत तसंच देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्ब आरोपांबाबत यावेळी पवारांच्या उपस्थितीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.
याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मोफत घर देण्यास विरोध केला आहे. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वसामान्यांबरोबरच म्हाडाची लॉटरी निघते, त्यातच आमदारांना घरांसाठी कोटा द्यावा. मात्र त्यांची स्वतंत्र सोसायटी नसावी, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. दरम्यान, आमदारांना मोफत घरं दिली जाणार नाहीत, असं स्पष्टीकरण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.