आरएसएसच्या इफ्तार पार्टीला मुंबईत विरोध
इफ्तार पार्टी देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना रष्ट्रीय मुस्लीम मंच ४ जून सोमवारी रोजी मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आज (सोमवार, ४ जून) मुंबईत होणाऱ्या इफ्तार पार्टीला विरोध होतोय. सह्याद्री अतिथीगृहात ही इफ्तार पार्टी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. या पार्टीसाठी मुस्लीम समाजातल्या शंभरपेक्षा जास्त दिग्गज मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलंय. त्याचबरोबर ३० इस्लामिक राष्ट्रांच्या राजदूतांनाही या पार्टीचं आमंत्रण देण्यात आलंय.
भाजप, आरएसएसने भूमिका का बदलली? - शिवसेना
दरम्यान, या इफ्तार पार्टीला विरोध करताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इफ्तार पार्टीला विरोध होता, मग आता भूमिका कशी बदलली, असा सवाल शिवसेनेनं केलाय. तसंच काही मुस्लीम संघटनांनीही या इफ्तार पार्टीला विरोध केलाय. तर ही पार्टी म्हणजे मुस्लीम मतं मिळवण्यासाठी संघ आणि भाजपचा डाव असल्याचं समाजवादी पार्टीनं म्हटलंय. त्याचबरोबर सह्याद्री अतिथीगृहाचा वापर फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासंदर्भातल्या कार्यक्रमांनाच व्हावा, असं असताना इथे संघाची इफ्तार पार्टी कशी, असा सवालही विचारला जातोय.
आरएसएसची इफ्तार पार्टी वाद, ठळक मुद्दे
- अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती आणि संस्थांशी सुसंवाद साधण्याच्या नावाखाली सह्याद्री अतिथीगृहात आज इफ्तार पार्टीचे आयोजन
- राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने आयोजित केला आहे कार्यक्रम
- कार्यक्रमाला उपस्थिती राहणाऱ्यांसाठी अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे भोजनाची व्यवस्था
- नाव अल्पसंख्याक विभागाचे, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे आयोजित करण्यात आली आहे इफ्तार पार्टी
- सह्याद्री अतिथीगृहात इफ्तार पार्टी आयोजित करण्यास विरोध
दरम्यान, इफ्तार पार्टी देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना रष्ट्रीय मुस्लीम मंच ४ जून सोमवारी रोजी मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.