सर्वकाही आकड्यांवर अवलंबून नसते- उद्धव ठाकरे
लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण, या चर्चेपेक्षा बंधुत्व टिकले हे अधिक महत्त्वाचे आहे.
मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या रस्सीखेचीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. मुंबईत आज शिवसेना आणि भाजप यांची संयुक्त पत्रकारपरिषद पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी शिवसैनिकांकडून सुरु असलेला आग्रह आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवू, या बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची आठवण पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना करुन दिली. तसेच जागावाटपात शिवसेनेने निम्म्यापेक्षा कमी जागांवर समाधान का मानले, असा प्रश्नही उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावेळी उद्धव यांनी सावध भूमिका घेत आकड्यांवर सर्वकाही अवलंबून नसल्याचे सांगितले.
मनापासून युती केल्यानंतर चर्चेने प्रश्न बोलून सुटू शकतात. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडतील. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बदलले आहे. युती होणार की नाही, हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. परंतु, लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण, या चर्चेपेक्षा बंधुत्व टिकले हे अधिक महत्त्वाचे असल्याचेही उद्धव यांनी सांगितले.
तसेच कणकवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजप समोरासमोर उभे ठाकल्याच्या मुद्द्यावरही उद्धव यांनी भाष्य केले. शिवसेनेने नितेश राणे यांच्याविरुद्ध सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेशी असलेली युती तोडण्याची भाषा सुरु आहे. मात्र, तिथे आम्ही आमनेसामने असलो तरी येथे बाजूबाजूला बसलो आहोत. त्यामुळे त्याची चिंता नसावी. त्यावर आम्ही तोडगा काढू, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.