परवानगी नाकारल्यानंतर मोर्चा काढणार- प्रकाश आंबेडकर
मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मुंबई : संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. केवळ आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे.
मोर्चासाठी राज्यभरातून लोकं मुंबईकडे रवाना
परवानगीबाबत सरकारं आधीच कळवायला हवं होतं. मोर्चासाठी राज्यभरातून लोकं मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे उद्या भायखळा ते आझाद मैदान मोर्चा निघणारच असा निर्धार आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.
गोंधळ झाला तर सरकार जबाबदार
मात्र उद्या गोंधळ निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी एकबोटेंपाठोपाठ संभाजी भिडेंनाही अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.