मुंबई: ताडेदव मिल कंपाऊंड घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरवलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केली. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, प्रकाश मेहता यांच्यावर सभागृहात झालेल्या आरोपांवर लोकायुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे सतत आपल्या मंत्र्यांना क्लीन चीट देणाऱ्या मुख्यंत्र्यांचेही पितळ उघडे पडले आहे. आता किमान जनाची नाही तर मनाची लाज वाटून प्रकाश मेहता यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा, असे धनजंय मुंडे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला. हे प्रकरण म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. यापेक्षा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या १६ मंत्र्यांच्या गैरकारभारातील सत्य हळूहळू बाहेर येईल, असेही धनजंय मुंडे यांनी सांगितले. 


ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. यामुळे संबंधित बिल्डरला तब्बल ५०० कोटींची फायदा झाला. मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. परंतु, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती. यावरून विधानसभेत जोरदार हंगामा झाला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठवले होते.


ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश मेहता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, आता मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, या मंत्र्यांना फडणवीस यांनी परस्पर क्लीन चीट देऊन टाकल्याचा आक्षेप विरोधकांकडून कायम घेतला जातो.