मुंबई: निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या नुकत्याच पार पडलेल्या मातोश्री भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. प्रशांत किशोर यांची ही भेट शिवसेना-भाजप युतीसाठी असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता या बैठकीतील चर्चेचा नवा तपशील समोर आला आहे. त्यानुसार प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक वेगळाच प्रस्ताव ठेवला आहे. प्रशांत किशोर यांनी युतीचा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडला असला तरी तुर्तास सबुरीने वागा, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. रालोआमध्येच राहून लोकसभेसाठी २४-२४ जागांचा प्रस्ताव मान्य करण्यास काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. युती झाल्यास आपण स्वत: शिवसेनेच्या प्रचारासाठी खास रणनीती तयार करू, असे आश्वासनही प्रशांत किशोर यांनी दिले. मात्र, या मोबदल्यात प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून फार मोठी गोष्ट पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. २०१९ च्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास पंतप्रधान म्हणून नितीश कुमार यांना पुढे आणण्याचा प्रशांत किशोर यांचा मानस आहे. अशी वेळ आल्यास विविध पक्षांची मोट कशी बांधायची याबद्दल प्रशांत किशोर यांनी उद्धव यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोड्याशा जागांसाठी लग्न कशाला मोडता; प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला


'ईकॉनॉमिक टाईम्स'च्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीश कुमार यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आणले जाईल. अशावेळी एनडीए आघाडीतील ज्या पक्षांना नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व मान्य नाही, पण काँग्रेसचेही सरकार नको, अशांची मोट बांधणे शक्य आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमिती , बिजू जनता दल आणि अण्णाद्रमुक यासारख्या प्रादेशिक पक्षांचे १०० खासदार निवडून येण्याची अपेक्षा आहे. याच खासदारांच्या जोरावर नितीश कुमार पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात. गेल्यावर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी बिजू जनता दलाच्या खासदारांनी जदयूच्या उमेदवाराला मते दिली होती. दरम्यान, याविषयी शिवसेना किंवा जदयकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, या माध्यमातून शिवसेनेला प्रलोभन दाखवून भाजपशी युती करण्यासाठी भाग पाडले जात आहे का, अशी शंकाही अनेकांच्या मनात उपस्थित झाली आहे.