अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: कोरोनासारख्या संकटकाळात स्वत:चे बंगले सजविण्यात मश्गुल असणारे मंत्री सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी ४० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सध्या वादात सापडला आहे. यावरुन विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. 
या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडीचे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांना टोला लगावला. त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या संकटकाळात सरकारी अधिकाऱ्यांनी बंगल्याची डागडुजी करणे योग्य नाही. राज्याचे मंत्री आपापल्या बंगल्यावर करोडोंचा खर्च करत आहेत व गाड्यांवर लाखोंचा खर्च करीत आहेत आणि आता महापालिकेचे आयुक्त आपल्या बंगल्यावर ५० लाखांचा खर्च करीत आहेत हे शोभनीय नाही. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाजूला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, पोलिसांना वेळेवर वेतन मिळत नाही, तसेच जे या परिस्थितीत कोविड योध्दे म्हणून काम करीत आहेत डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ त्यांनाही त्यांचा पगार वेळेवर  मिळत नाही, त्यामुळे अशावेळी आपल्या बंगल्यावर चाळीस-पन्नास लाख रुपये खर्च करणे हे उचित नाही. 


कोरोनाच्या संकटकाळात पालिका आयुक्तांच्या बंगल्यासाठी ४० लाखांच्या उधळपट्टीचा घाट

बंगल्यामध्ये किरकोळ गळती वा दुरुस्ती असेल तर २-३ लाख रुपये खर्च करुन ती दुरुस्ती करणे समजण्यासारखे आहे, परंतु कोविडच्या संकटांत अशा प्रकारचा लाखो रुपयांचा खर्च करणे निश्चितच समर्थनीय नाही. सरकारी अधिकारी जनतेच्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी करत असतील तर त्याला लगाम घातला पाहिजे, परंतु स्वत:चे बंगले सजविण्यात मशगुल असणारे मंत्री अधिका-यांना कुठल्या तोंडाने लगाम घालणार आहे, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे हा प्रकार निंदनीय असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.