मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे-पाटील यांनी आज (दिनांक ३ डिसेंबर २०२०) सायंकाळी संयुक्त पाहणी केली.

 

यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे रविवार दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी चैत्यभूमी येथे होणार्‍या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब: bit.ly/abhivadan2020yt / फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt या लिंकचा उपयोग करता येईल.

 

दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याची पाहणी श्री. जयस्वाल यांनी आज केली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या तयारीची पाहणीदेखील त्यांनी श्री. नांगरे-पाटील यांच्यासह केली.

 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱया नागरी सेवा-सुविधा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर दिल्या जाणार नाहीत. या नागरी सेवा-सुविधा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विशेष सुविधा यंदा दिल्या जाणार आहेत.

या पाहणी दौऱयाला अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ २) श्री. विजय बालमवार,  प्रसारभारतीचे डॉ. अश्विनी कुमार, पोलीस उपायुक्त श्री. प्रणय अशोक, महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर  यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

यंदा कोरोना विषाणू संक्रमण पाहता, मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन यापूर्वी देखील करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे. 

 

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.


महापरिनिर्वाण दिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत. यूट्यूब: bit.ly/abhivadan2020yt / फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt