अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : विद्यमान सरकारची मुदत संपूनही नवीन सरकार अस्तित्वात न आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं अपरिहार्य ठरेल. ते टाळण्यासाठी निवडून आलेल्या पक्षांनी बहुमत सिद्ध करणे हाच एकमेव पर्याय आहे. अन्यथा विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं हाच केवळ मार्ग उरेल, असं मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ प्रोफेसर उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी... तसं न झाल्यास तो जनतेशी केलेला विश्वासघात ठरेल असे खडे बोलही बापट यांनी सुनावले आहेत.


...तर काय होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या अर्थात शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेची मुदत संपतेय. त्याचसोबत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अस्तित्वात असलेल्या सरकारची मुदतही उद्या संपतेय. यावर राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.


- ९ नोव्हेंबरपर्यंत कुठल्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करतील


- हा मोठा पक्षही राज्यपालांच्या निमंत्रणावरून सत्ता स्थापन करण्यास आला नाही तर दुसऱ्या पक्षाला संधी देतील


जर मोठा पक्ष सत्ता स्थापनेसाठी आला तर त्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल ठराविक कालावधी देतील


- हा पक्ष बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरला तर नवं सरकार स्थापन होईल


- जर हा पक्ष बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरला तर दुसरे पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात


- त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल ठराविक कालावधी देतील