मुंबई : थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मुंबई महापालिका आता दवंडी पिटणार आहे. मालमत्ता कर न भरल्यास व्यावसायिक मालमत्ताधारकांवर पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई सुरु होणार आहे. एकीकडे ५०० स्क्वे. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणाऱ्या पालिकेकडून इतर थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी दवंडी देण्यात येणार आहे. मालमत्ता करासाठी मुंबई महापालिका आक्रमक झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालमत्ता कराची वसूली थकल्याने मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे तिजोरीची गळती कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून आता दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा करण्याविषयी मुंबईकरांना सूचना दिल्या जात आहेत.


मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशी दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा न केल्यास काय कारवाई होऊ शकते, हे ही सांगितले जातेय. सध्या एच पूर्व विभागात अशी दवंडी दिली जात आहे. कारवाईत मालमत्तेची जप्ती होऊ शकते तसेच पाणीपुरवठा रोखला जाऊ शकतो. त्यामुळे थकीत कर भरण्याशिवाय कोणताही पर्यार असणार नाही.


५०० स्क्वे. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी दिल्यानंतर पालिकेला ३९८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यात, निश्चित धोरणाच्या अभावामुळे इतर मालमत्तांचीही वसूली रखडली आहे. एकूण मुंबई महापालिकेचा एकूण १२ हजार कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. त्यांपैकी ९००० हजार कोटींच्या मालमत्ता करासाठी विवीध कोर्ट केसेस सुरु आहेत. उर्वरीत ३००० कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी १५०० कोटींचा मालमत्ता कर येत्या दोन महिन्यांत म्हणजेच मार्च अखेरीपर्यंत (आर्थिकवर्ष समाप्तीपर्यंत) वसूल करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.



कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी, मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसूलीची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईकरांना मालमत्ता कर भरणासाठी जागृत करण्यासाठी ही मोहीम आहे. पुढील आठवड्यापासून महापालिका आक्रमक होत टॉप ५ व्यावसायिक मालमत्तांची कर न भरल्यास जप्ती करणार आहे. तर १० व्यावसायिक मालमत्तांचा कर न भरल्यास लिलाव होणार आहे.


महापालिकेने सुरुवातीला प्रत्येक वॉर्डमधील १०० अश्या २४ वॉर्ड मधील २४०० व्यावसायिक मालमत्तांची वसूली तातडीने करण्याचे किंवा त्यांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रहिवासी भागांतील मालमत्तांवर मात्र इतक्यात कारवाई होणार नाही. मात्र, सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा यासाठी पालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे.