दीपक भातुसे, मुंबई : पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस पक्षाला गृहीत धरू नका, काँग्रेस या प्रकरणी तडजोड करणार नाही. असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत पदोन्नती आरक्षणावरुन मतभेद समोर आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन राऊत यांची प्रसिद्ध पत्रकाव्दारे भूमिका मांडली आहे. 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बैठक न लावल्यास मंत्रिमंडळ बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.


दलित मागासांची मते हवीत, मात्र त्यांच्या हिताच्या विरूद्ध भूमिका घ्यायची हे कदापीही चालणार नाही. अशी आक्रमक भूमिका नितीन राऊत यांनी घेतली आहे.


अजित पवार यांच्या कार्यशैलीबद्दलही उघड नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार जर मंत्रीमंडळ उपसमितीचे सर्व अधिकार आपल्यालाच आहे असे समजत असतील तर हा उपसमितीचा अपमान असल्याची भूमिका नितीन राऊत यांनी प्रसिद्ध पत्रकात मांडली आहे.


काँग्रेस नेहमीच मागासवर्गियांच्या सोबत राहिली आहे, मात्र मागासवर्गीयांसबोत जे सध्या चालू आहे ते आम्ही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या कानावर घालू. मंत्रीमंडळातून बाहेर पडायचे की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडचा आहे. मात्र काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, असं राऊत यांनी ठणकावलं आहे.