मुंबई :  मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांची त्यांच्या शिवतीर्थ (Shiv Tirtha) या निवासस्थानी भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. मोरे यांनी आपल्याला सर्वच पक्षांकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.


राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माझ्या ज्या शंका होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत. ठाण्यात 12 एप्रिलला होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. 


ठाण्याची सभा ही उत्तरसभा आहे. ठाण्याच्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील त्यामुळे तू ठाण्याच्या सभेत ये, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मी 100 टक्के आहे, मी मनसेत आहे आणि मनसेतच राहणार असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. 


वसंत मोरेंन व्यक्त केली होती नाराजी
संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले, यात मला शंभर टक्के यश मिळालं आहे. या यशामुळे काही पार्टटाईम जॉबवाले नाराज झाले होते. त्यांच्यामुळे थोडी अडचण झाली, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती.


या पार्टटाईम जॉबवाल्यांबद्दल आज राज ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, मशिदींसमोर भोंगे लावण्याने माझ्या प्रभागातील अडचणी राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहे. राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचंही वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती. आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आपण समाधानी असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.