मुंबई: पुण्यात सोमवारी कर्णबधीर तरुणांच्या मोर्चावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराचे मोठे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचा आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिला आहे. तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले. तर दुसरीकडे पोलिसांच्या लाठीमारानंतर आंदोलनकर्ते कर्णबधिर पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या देऊन बसले आहेत. उद्या त्यांचे प्रतिनिधी मुंबईला जाणार आहेत. मुंबईत सरकारकडून कर्णबधिरांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन थांबवले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 शैक्षणिक सुविधांसह रोजगाराच्या मागणीसाठी कर्णबधीर तरुणांकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काही तरुणांनी बॅरिकेट्स बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. याप्रकरणी पोलिसांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, आंदोलन हिंसक वळण घेतंय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आम्हाला सौम्य लाठीमार करावा लागला. 



 लाठीमाराच्या या प्रकारामुळे विरोधकांनी सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवली आहे. या सरकारची लाज वाटते. हे फडणवीसांचे नव्हे, तर जनरल डायरचे सरकार आहे. ही घटना सामाजिक न्यायाचे उल्लंघन व वंचितांच्या हक्कांची पायमल्ली करणारी आहे. या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यांनी तातडीने राजीमाना द्यायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.