दीपाली जगताप - पाटील, झी मीडिया, मुंबई : निवडणुका आल्या म्हणजे राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार होणारच... अर्थातच तरुण मतदारांना खुश करण्यासाठी प्रचाराची पद्धतही बदलावी लागणार... दुसरीकडे, रणवीर सिंगचा 'गल्ली बॉय' या सिनेमातली रॅप साँगही हीट होताना दिसत आहेत... आता तुम्ही म्हणाल राजकारण आणि रॅप साँगचा काय संबंध? अहो, हीच तर आहे सध्याची प्रचाराची हीट पद्धत.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अपना टाईम आएगा' म्हणत 'गल्ली बॉय'मधल्या रणवीर सिंगनं तरुणांना भुरळ पाडलीय. सिनेमातलं हे रॅप साँग तर तुम्ही पाहिलंच असेल... याच धर्तीवर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी 'पूरा बहुमत आएगा' म्हणत नवीन रॅप साँग आणलंय... 


तरुणांना भुरळ घालणारा, जगभरात प्रसिद्ध असलेला गाण्याचा रॅप हा प्रकार गेल्या काही वर्षात देशभरात धुमाकूळ घालतोय. म्हणूनच भाजपाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक असलेल्या दिल्लीतील दोन चुलत बहिणींनी हा रॅप तयार केलाय. न्योनिका आणि इशिता या अवघ्या १२ आणि १५ वर्षांच्या बहिणींनी 'न्योनिशी कजीन्स' या त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. 



याला तरुण मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. पण हा रॅप केवळ मनोरंजनासाठी असल्याचे या दोन्ही रॅपर्सचे म्हणणे आहे.


देशात सर्वाधिक मतदार सध्या तरुण वर्ग आहे. तरुणांना रॅपची भाषा अधिक लवकर समजते आणि त्यातून मनोरंजनही होते. त्यामुळेच की काय २०१४ साली सोशल मीडियावर प्रचाराची क्रांती केलेल्या भाजपा आणि त्यांच्या समर्थकांकडून आता प्रचारासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जात आहेत.



गेल्या काही दिवसांपासून देशातला मतदार कधी राजकारणावर सिनेमा पाहतोय तर कधी राजकीय नेत्यांच्या जीवनावर... आता तर मतदारांसाठी रॅप व्हिडिओही तयार होऊ लागलेत. त्यामुळे 'आपली वेळ येणार... पूर्ण बहूमत येणार' असं जरी प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असले तरी मनोरंजनाच्या माध्यमातला हा नवीन प्रचार मतं मिळवून देणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच