दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : एकीकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रीपदाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली असताना विखे-पाटील यांचा अजूनही भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही किंवा ते भाजपाचे प्राथमिक सदस्यही झालेले नाहीत. विखे-पाटील यांनी भाजपाकडून मागील आठवड्यात मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांना गृहनिर्माण खातं देण्यात आलं. मात्र विरोधी पक्षनेते पद सोडून आणि काँग्रेसला रामराम करून मंत्री झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अद्याप भाजपामध्ये प्रवेश झाला नसून ते भाजपाचे सदस्यही झाले नसल्याची माहिती 'झी २४ तास'ला मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे याने भाजपाच्या तिकिटावर नगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. ही जागा सुजयला मिळावी यासाठी विखेंनी प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादीने ही जागा न सोडल्याने सुजय विखेने अधिकृतपणे मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपाकडून लोकसभा निवडणूकही लढवली. 


सुजय भाजपाकडून खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांचाही भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा होती. मात्र त्यांचा अधिकृत प्रवेश न होता अथवा ते भाजपाचे सदस्य न होताच त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ दिली आणि त्यांचा समावेश मंत्रीमंडळात करण्यात आला. मंत्रीपदाची शपथ घेऊन पाच दिवस उलटून गेले आहेत. तरीही ना त्यांचा भाजपात प्रवेश झालाय, ना ते भाजप पक्षाचे प्राथमिक सदस्य झाले आहेत. पक्षाचा सदस्य न होताच राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रीपद दिल्याने पक्षातही आश्चर्य व्यक्त केलं जातंय.