दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राधाकृष्ण विखे पाटलांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवलाय. विखे पाटलांनी यापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. आता त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेस पक्षात आपली घुसमट होत होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केलीय. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत अब्दुल सत्तारही उपस्थित होते. सत्तार यांनी मात्र अद्याप आपला राजीनामा दिलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपामध्ये जाण्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासाठी अब्दुल सत्तार यांच्यासोबतच जयकुमार गोरे, भारत भालके, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. याशिवाय नितेश राणे यांनी यापूर्वीच फारकत घेतली असून कालिदास कोळंबकरही भाजपाच्या संपर्कात आहेत.


राधाकृष्ण विखे पाटील यांनी हरिभाऊ बागडेंकडे सोपवला राजीनामा

आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. येत्या ९ जून रोजी विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होणार, अशीही शक्यता वर्तवण्यात येतेय.


तर दुसरीकडे, काँग्रेसला आणखी एक खिंडार पडण्याची शक्यता आहे. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके भाजपाच्या वाटेवर आहेत. भालकेंनी राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. त्यामुळे विखेंसोबत भालकेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.