देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : सध्या पर्यावरण पूर्वक रेल्वे स्थानक तयार करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने विविध रेल्वे स्थानकावर प्रयत्न सुरू आहेत. हार्बर मार्गावरील किंग सर्कल रेल्वे स्थानकाने यात पुढाकार घेत स्थानकाचं रुपडं बदलवून टाकलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिली, गुलाब, जास्वंद, चाफा, मोगरा ही सुंदर फुलझाडं, विविध प्रकारच्या वेली, भिंतींवर प्राण्यांची चित्र रंगवलेली आणि बसायला बाकडे एखाद्या नयनरम्य अशा बागेत तर आपण नाही ना असं वाटावं. मात्र ही बाग नसून हार्बर मार्गावरील किंग सर्कल या स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे. रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एन के सिन्हा आणि त्यांच्या इतर कर्मचारी वर्गाने ही किमया केली आहे.


बागेसोबतच रेल्वे स्थानक, आजूबाजूचा परिसर सुंदर, स्वच्छ रहावा यासाठी भिंती, पायऱ्या रंगवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सामाजिक संदेशही देण्यात आलेत. स्वच्छ, सुंदर अशा रेल्वे स्थानकामुळे प्रवासीही समाधानी आहेत.


यापूर्वी किंग सर्कल हे स्थानक भकास स्थानक म्हणून ओळखलं जात होतं या स्थानकावर चर्सी गर्दुल्ल्यांचा वावरही असायचा मात्र इच्छा शक्ती आणि सातत्य असेल तर भकास स्थानकाला कसं झकास करता येईल हेच किंग सर्कल स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलं.