दीपक भातुसे, मुंबई :   श्रमिकांना रेल्वे पुरेशा गाड्या देत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज्य सरकारवर पलटवार करणाऱ्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा दावा आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी खोडून काढला. राज्य सरकारने केंद्राकडे रोज ८० गाड्यांची मागणी केली होती, त्यातील केवळ ३० गाड्या आम्हाला मिळत होत्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळणं सुरु केलं, अशी टीका अनिल परब यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ मेनंतर आम्ही १७२ गाड्यांची मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरे बोलल्यानंतर रात्री २.३० वाजता अचानक गाड्यांचे वेळापत्रक पाठवण्यात आलं. यात पश्चिम बंगालशी एका दिवसात ४३ गाड्यांचं वेळापत्रक दिलं. पश्चिम बंगाल सरकारने वादळाच्या पार्श्वभूमीवर दररोज दोन गाड्या पाठवण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. ती विनंती राज्य सरकारने मान्य केली होती. असं असताना जाणूनबुजून एका दिवसात ४३ गाड्या सोडण्याचा रडीचा केंद्र सरकार खेळतं, अशी टीका अनिल परब यांनी केली आहे.


अनिल परब पुढे म्हणाले, असा रडीचा डाव खेळायचा आणि मग आरोप करायचा आम्ही गाड्या देतोय आणि महाराष्ट्र सरकारची क्षमता नाही. रात्री अडीच वाजता वेळापत्रक येतं आणि त्यातील बहुतांश गाड्या दुपारी १२ च्या आत सोडायचे वेळापत्रक असते. रमझानचा बंदोबस्त आटोपून पोलीस घरी गेलेले असल्याने ते शक्य नव्हते.


महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला. आम्ही गाड्या देतोय, पण महाराष्ट्र सरकार माणसं पाठवत नाही, हे दाखवून देण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.



परप्रांतिय मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी श्रमिक सोडण्यावरून ठाकरे सरकार आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात रविवारी तूतू-मैमै सुरु होतं आणि त्यावरून राजकारणही रंगलं होतं.