मुंबई : सध्या देशातील अनेक भागात पाऊस कोसळत असला तरी महाराष्ट्रातही अनेक भागात पाऊस थैमान घातलंय. शुक्रवारी दुपारपासून मुंबई आणि ठाण्यात पावसाची कोसळधार सुरु आहे. याचदरम्यान भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याकडून पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यात आयएमडीने मुंबईसह आसपासच्या परिसराला यलो अलर्ट जारी केलाय. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


परतीच्या मान्सूनमुळे राज्याच्या इतर अनेक भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाबरोबरच 30 ते 40 किमी जोरदार वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं.


भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता हवामान खात्याकडून संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.


साधारणपणे मुंबईत 8 ऑक्टोबरपर्यंत आणि महाराष्ट्राच्या काही भागात 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा मुक्काम असल्याचं चित्र असतं. मात्र यावेळी मान्सून आणखी काही दिवस राज्यात थांबणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा उशिराने होण्याची शक्यता असून पुढचे 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.