मुंबई: राज्यात येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नाताळ आणि नववर्षाच्या आनंदावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार  मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणही ढगाळ राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. यापूर्वी वेधशाळेने पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होईल, असेही वेधशाळेने म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह ठाणे आणि कल्याण परिसरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडाही वाढला आहे. दरम्यान, काहीवेळापूर्वीच मुंबई आणि ठाण्याच्या परिसरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्याचेही समजते.



यंदा मान्सूनचा हंगाम संपूनही पाऊस बराचकाळ महाराष्ट्रात रेंगाळत होता. त्यामुळे शेतीचे गणित पूर्णपणे कोलमडले होते.  राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे पार झोपून गेली. यामुळे भाजीपाल्यांचे दरही कडाडले. गेल्या काही दिवसांत कांदा, लसूण आणि भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याचे दिसून आले.