दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मोदी ते गांधी... असा प्रवास सध्या राज ठाकरेंचा होताना दिसतोय...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. ठाकरेंच्या अलीकडच्या सर्व व्यंगचित्रांतून ते अधोरेखित होतंय...काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी मात्र त्यांच्या व्यंगचित्रांत आश्वासकता दिसू लागलीय.


मोदी आणि राज ठाकरे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींचा जाहीर पुरस्कार करणारे राज ठाकरे आज मोदींवर उघड टीका करतायत.... गेल्या सहा महिन्यांत त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्त्रं त्यांची भूमिका स्पष्ट करतायत.... बहुतांश व्यंगचित्रं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांना लक्ष्य करणारी आहेत. आता तर राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे पंतप्रधान, असा उपहासात्मक उल्लेख करायला सुरुवात केलीय. 


राहुल गांधींविषयी मतपरिवर्तन


एकीकडे राज ठाकरे यांचा मोदींबाबत अपेक्षाभंग होत असताना काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी मात्र त्यांचं मतपरिवर्तन होताना दिसतंय...गुजरात निवडणुकीच्या निकालांवर चपखल भाष्य करणारं त्यांचं व्यंगचित्र हे त्याची खणखणीत साक्ष देतंय.


राज ठाकरेंचे व्यंगचित्र


या व्यंगचित्रातून अनेक राजकीय संकेतही मिळतायत. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केलीय, तर दुसरीकडे टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडूही NDA तून बाहेर पडण्याच्या धमक्या देतंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत NDA फुटीच्या मार्गावर असताना UPA मात्र हळूहळू पुन्हा एकसंघ होऊ पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि अन्य समविचारी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. या मोर्चेबांधणीत येणाऱ्या काळात राज ठाकरे सहभागी होणार का याबाबत उत्सुकता असेल.


ठाकरेंचं मोदीप्रेम ते मोदी विरोध हे वर्तुळही आता पूर्ण झालंय. मोदी-शाह या जोडीचा महाराष्ट्राकडे विशेषतः मुंबईकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मोदींनी राज ठाकरेंशी तोडलेला संपर्क हे सगळं त्यास कारणीभूत ठरल्याचं मानलं जातंय.