मुंबई : सीबीएसई पेपरफुटीच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका, असं आवाहन त्यांनी पालकांना केलंय... तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही देणारं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलंय.


तेव्हा गप्प का ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सीबीएसई पेपरफुटीनंतर तत्काळ प्रतिक्रिया देणारे राज ठाकरे दहावी आणि बारावीच्या मराठी माध्यमांचे पेपर फुटले तेव्हा गप्प का होते, असा सवाल आता केला जातोय. मराठी माध्यमाच्या शाळांऐवजी इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंना जास्त पुळका आहे का, अशी विचारणाही यानिमित्तानं केली जातेय.


काय आहे आवाहन ?


सस्नेह जय महाराष्ट्र,
सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?
माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील. 


आपला नम्र 


राज ठाकरे