`सरकार माझ्या हातात द्या, मागण्या पूर्ण करतो`
मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची राज ठाकरेंनी भेट घेतली.
मुंबई : मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची राज ठाकरेंनी भेट घेतली. मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे सोमय्या मैदानात दाखल झाले. सरकार एकदा माझ्या हातात द्या, मी तुमच्या मागण्या कशा पूर्ण करतो ते बघा, असं आश्वासन राज ठाकरेंनी या शेतकऱ्यांना दिलं. तसंच हे सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
तुमच्या पायामधून आलेलं रक्त विसरु नका, असं राज ठाकरेंनी जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही तर उद्योजकांना देणार, असं अमित शहा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते, बघा आपण काय सरकार निवडून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
मोर्चावेळी राग व्यक्त करायचा आणि निवडणुकीला विसरायचं असं करु नका. राग कायम ठेवा. तुमच्यासाठी जे जे शक्य आहे ते मी आणि माझा पक्ष करेल, असं आश्वासन राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.
शेतकरी मध्यरात्री आझाद मैदानाकडे जाणार
शेतकरी मोर्चा सध्या सोमय्या मैदानामध्ये असून मध्यरात्री १२ नंतर मोर्चा आझाद मैदानाकडे जाईल. १०वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित ढवळे यांनी सांगितलं.