Raj Thackeray on Narhari Zirwal protest : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आरक्षणासह अनेक मुद्द्यांनी डोकं वर काढलं आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून  धनगर (Dhanagar) समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबतच्या प्रकरणाला गंभीर वळण मिळताना दिसत असून, शुक्रवारी परिस्थिती बऱ्याच अंशी हाताबाहेर गेली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दोन आदिवासी आमदारांसह मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळ्यात उड्या मारल्या आणि आंदोलनाची हाक दिली. झिरवाळांच्या निषेधाची ही पद्धत सध्या त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावण्यामागचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा झिरवाळांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, हा कुठला निषेध? असा बोचला सवाल केला. सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं स्पष्टपणे म्णता येत नसल्यामुळं जनतेच्या सेवेसाठी सत्ता हवी असं म्हणत तुम्ही सरदारांच्या साथीनं सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या अशा शब्दांत ठाकरे यांनी त्यांना खडे बोल सुनावले.  X च्या माध्यमातून त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत झिरवाळांसह सत्ताधाऱ्यांनाही इशारा दिला.



काय म्हणाले राज ठाकरे? 


'सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी , आदिवासी समाजवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? 


सत्तेशिवाय राहू शकत नाही, असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?


सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरं मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. 


महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे. 


आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. 


तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा !'