Raj Thackery Thank Shinde-Fadnavis: बुधवारी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत बांधकांमाचा मुद्दा उपस्थित केला. मुस्लिम समाजातील काही लोकांनी अनधिकृतपणे मुंबईतील माहीमच्या समुद्रासहीत, सांगलीमध्येही काही अनधिकृत बांधकाम केल्याचे पुरावे सादर करत यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई करत ही अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. या कारवाईनंतर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवली आहे. महीममधील मजारीचा आधीचा आणि नंतरचा फोटो शेअर केला आहे. राज यांनी प्रशासनाबरोबरच मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी हिंदू बांधवांनाही एक आवाहन केलं आहे.


राज यांनी दिलेलं आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याजवळ समुद्रात केलेल्या बांधकामाचे ड्रोन फुटेज दाखवले होते. "माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याजवळ समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. 2 वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. माहीम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. महानगरपालिकेचे लोक फिरत असतात त्यांचं लक्ष नाही. दिवसाढवळ्या हे सुरु आहे आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?" असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. "माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहिल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. एका महिन्याचा अल्टीमेटम देतोय. नाहीतर त्याच्याबाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे होईल ते होईल," असं म्हणत राज यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिलं होतं.


आता मानले आभार


"सस्नेह जय महाराष्ट्र! धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल, सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो," असं राज ठाकरेंनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.



हिंदूंना केलं आवाहन


"आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं," असं आवाहनही राज यांनी केलं आहे.