मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपमध्ये (BJP) अटीतटीची लढाई सुरु आहे. दोघांसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं होतं. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेरपर्यंत मतदान करताच आलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदान करता यावं यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आणि जेवढे जमेल तेवढे प्रयत्न करण्यात आले. मतदान करता यावे यासाठी एकमेव आशा असलेली कायदेशीर किंवा हाय कोर्टातील प्रयत्नही संपुष्टात आले. 


नवाब मालिकांना कोर्टात कोणती चूक भोवली ?
वैयक्तिक हमी बॉंडवर काही तासांसाठी सुटका करून पोलिस सुरक्षेत विधानभवनात जाऊ देण्याची विनंती मलिक यांच्यावतीने याचिकेत करण्यात आली होती. मात्र वैयक्तिक हमीवर सोडण्याचा आदेश देणे म्हणजे जामिनावर सोडण्यासारखेच आहे आणि त्याकरिता तुम्हाला योग्य त्या कोर्टात जावे लागेल, असे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केले.


त्यानंतर सध्या आम्ही वैयक्तिक हमीवर नाही तर केवळ पोलिस सुरक्षा व्यवस्थेत मतदान करण्यासाठी विधानभवनात पाठवण्याची परवानगी मागत आहोत. त्यामुळे आमच्या याचिकेत कोर्टातच तातडीने दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केली. त्यानंतर दुरुस्ती करू देण्याची विनंती न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी मान्य केली. सुधारित याचिका नवाब मालिकांच्या वकिलांनी दुसऱ्या बेंचसमोर दाखल केली आणि तातडीच्या सुनावणीची मागणी केली. मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. 


अनिल देशमुख यांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत 
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर तर हायकोर्टात सुनावणीच झाली नाही. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. अनिल देशमुख यांचे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या अधिकच किचकट होतं. 


अनिल देशमुख यांच्या याचिकेवर एकतर न्यायमूर्ती प्रकाश नाईक किंवा न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टसमोर सुनावणीसाठी जाण्याची शक्यता होती. हे दोघेही न्यायमूर्ती वैयक्तिक कारणास्तव अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेऊ शकते नसते. यापूर्वी याच कारणांमुळे दोन्ही न्यायमूर्तींनी अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिलेला आहे. अशा परिस्थितीत अनिल देशमुख यांच्या वकिलांना मुख्य न्यायमूर्तींकडे जाऊन विशेष एकल न्यायाधीश पीठ नेमावी अशी विनंती करावी लागली असती आणि ही प्रक्रिया वेळखाऊ होती. 


त्यातच नवाब मलिक यांची कायदेशीर प्रक्रिया त्यामानाने सुरळीत होती तरीही मलिक यांना मतदान करण्यासाठी परवानगी मिळाली नाही. ते पाहता अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत.