भारिप -एमआयएम युतीचा फायदा भाजप-आरपीआयलाच - रामदास आठवले
एमआयएम - भारिप युतीचा फायदा भाजप आरपीआयलाच होईल.
मुंबई : एमआयएम - भारिप युतीचा फायदा भाजप आरपीआयलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. रिपब्लिकन पक्षाला लोकसभा निवडणुकीत 2 ते 3 आणि विधानसभा निवडणुकीत 30 ते 35 जागा हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
रामदास आठवले स्वतः दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून, तिरंगी लढतीत आपलाच विजय होईल, असा दावा त्यांनी झी २४ तासशी बोलताना केलाय. 'शिवसेना स्वतंत्र लढल्यास दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत. मी, राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड अशी लढत होईल. मी विजयी होईन.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्यास माझ्यासाठी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा, अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेनेला करणार. मुख्यमंत्री शिवसेनेची समजूत काढतील, अशी आशा यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
एमआयएम-भारिप या आघाडीचे 2 - 3 आमदार तरी निवडून येतील का, अशी मला शंका आहे. पण या आघाडीला काही मतं मिळतील. ज्याचा आम्हाला फायदा होईल. दलित मतं प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आहेत, असं मानण्याचा काही भाग नाही. माझ्यामागे समाजाची मोठी ताकद आहे, आठवले म्हणालेत.