मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मध्य मुंबईत भाजप-आरपीआय युतीचा उमेदवार म्हणून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले हे निवडणूक लढणार असल्याचे घोषित करण्यात आले. यासाठी आज दक्षिण मध्य मुंबईतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आढावा घेण्यात आला. येत्या निवडणूकीत भाजप-शिवसेना युती नाही झाली तरी आरपीआयकडून रामदास आठवले हे नाव निश्चित झालंय.


सेनेवर दबाव ?


 युतीत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेकडे असून सेनेचे राहुल शेवाळे हे इथले विद्यमान खासदार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय. भाजपकडून मात्र युतीबाबत सेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना नेतृत्व स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे रिपाइंची बैठक आणि आठवलेंच्या घोषणेआडून भाजपाची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा सुरु आहे.