आताची मोठी बातमी, साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीकडून अटक, चार तासांच्या चौकशीनंतर कारवाई
शिवसेना नेत रामदास कदम यांचे सख्खे भाऊ सदानंद कदम यांना आज सकाळी ईडीने त्यांच्या खेडमधल्या निवासस्थानावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
Sadanand Kadam Arrest : दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) ईडीने (ED) सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना अटक केली आहे. आज सकाळी ईडीने सदानंद कदम यांना त्यांच्या खेडमधल्या (Khed) निवासस्थानातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना खेडमधून मुंबईतल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं. इथे त्यांची तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सख्खे लहान भाऊ आहेत.
दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. याप्रकरणाशी अनिल परब यांच्याबरोबर सदानंत कदम यांचाही संबंध असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागिदार असल्याचं बोललं जातं. 2020 मध्ये सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन विकत घेतली. याच व्यवहारात भ्रष्टाचारा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ईडीनेही या व्यवहाराची चौकशी सुरु केली असून याचप्रकरणात सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कोकणातल्या दापोली इथल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट उभारण्यात आलं आहे. या रिसॉर्टमध्ये अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या भागिदारी असल्याचा आरोप करत हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी दापील पोलीस स्टेशनमध्ये अनिल परब यांच्यासह तिथले तत्कालीन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल परब यांनी खोदी कागदप्तर सादर करुन शासनाचा महसूल बुडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय तत्कालीन मालमत्ता धारक अनिल परब यांनी इमारत पूर्ण नसतानाही इमारत पूर्ण असल्याचं दाखवून ग्रामपंचायत मुरुड दापोली यांची पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तत येताच साई रिसॉर्ट पाडकामाचे आदेश देण्यात आले होते. बांधकाम पाडण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आला आहे. त्यामुळे रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच अनिल परब यांच्यासह सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता साई रिसॉर्टशी संबंधीत सदानंद कदम यांना अटक करण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे.