कौतुक तर होणारचं ! राणीबागेतील प्राणिपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल
प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान
मुंबई : भायखळा येथील राणीबागेत प्राण्यांच्या देखभालीचे काम करणाऱ्या प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झालाय. विशेष म्हणजे देशभरातील प्राणी संग्रहालयातीन केवळ ४ प्राणीपालांना या पुरस्कार देण्यात आला. त्यात मुंबईच्या गुरुनाथ नार्वेकर यांच्या नावाचा समावेश आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला. सध्या कोरोना काळामुळे त्यांना ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडला.
देशभरातील १५१ प्राणिसंग्रहालयांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांमधून चौघांची निवड यंदाच्या पुरस्कारासाठी करण्यात आली. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून‘प्राणिमित्र पुरस्कार २०२०’ हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. नार्वेकर हे ‘प्राणिपाल’ पदावर गेली तब्बल ३० वर्षे काम करत आहेत. येत्या डिसेंबरमध्ये ते निवृत्त होणार आहेत. त्याआधीच केंद्राकडून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱया कर्मचाऱयांची सन्मान पूर्वक दखल घेतली जावी या हेतून ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यावर्षीपासून ‘प्राणिमित्र पुरस्कार' सुरु केलाय.
देशभरातील प्राणिसंग्रहालयात वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय.
राणीबागेत गेली ३० वर्षे प्राणीपाल म्हणून काम करणाऱ्या नार्वेकरांनी प्राणी-पक्ष्यांची मनोभावे सेवा केलीय. राणीबागेतील वन्यप्राण्यांची आरोग्यविषयक देखभाल, औषधोपचार करण्याचे काम ते करतात. त्यांचे हे कार्य पाहून त्यांना 'पशुवैद्यकीय व्रणोपचारक'पदी पदोन्नती मिळाली. तसेच कोरोना काळात देखील त्यांनी एकही दिवस रजा न घेता उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे.