मुंबई : कोविड-१९चा प्रादुर्भाव जरी मुंबई शहरात आटोक्यात येत असला तरी रुग्ण अद्याप सापडत आहेत. त्यामुळे चिंता कायम आहे. वांद्र्यातील 'मातोश्री'च्या दारी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालेला पाहायला मिळत आहे. मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकाला कोविड-१९ चा संसर्ग झाला आहे. त्याआधी तेजस उद्धव ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे 'मातोश्री'त चिंतेचे वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मरोळ येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षारक्षकांचीही तपासणी करण्यात आली आहे. मात्र, तेजस ठाकरे अनेक दिवस घराबाहेर पडलेले नव्हते. त्यामुळे त्यांना कोणताही धोका नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आता सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने सांगण्यात आले आहे. 



 दरम्यान, यापूर्वी मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडणे शक्यतो टाळत आहेत. मात्र, याच कारणामुळे ते सध्या विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आपल्या मुलाखतीतून चोख उत्तर दिले आहे.


ठाकरे सरकारमधील चौथ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. तेही क्वारंटाईन झाले आहेत. औरंगाबदमधील मंत्री अब्दुल सत्तारही कोरोना बाधित असल्याचे त्यांनीच सांगितले. त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच राज्यसभा खासदार फौजिया खान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना परभणीत ही लागण झाली. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती.