मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनंतर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसणार आहेत. आरएसएसशी जोडल्या गेलेल्या एका संघटनेचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाला मोहन भागवत आणि रतन टाटा एकत्र दिसतील. नाना पालकर स्मृती समितीच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात रतन टाटा जाणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. पण या कार्यक्रमाची अजूनही औपचारिक घोषणा झालेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम २४ ऑगस्टला होणार आहे. याआधी प्रणब मुखर्जींनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यामुळे काँग्रेस नेत्यांनी मुखर्जींवर टीका केली होती. त्यामुळे आता रतन टाटांवरही टीका होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पालकर स्मृती समिती एक एनजीओ आहे. गरीब रुग्णांसाठी ही एनजीओ काम करते. या एनजीओच्या वार्षिक कार्यक्रमाला रतन टाटा आणि मोहन भागवत यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. रतन टाटा आणि मोहन भागवत एकत्र असण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी डिसेंबर २०१६ साली रतन टाटा यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट दिली होती. आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकावर जाऊन टाटांनी श्रद्धांजलीही वाहिली होती.


नाना पालकर स्मृती समितीचं कार्यालय मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाजवळच आहे. टाटाच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची देखभाल नाना पालकर स्मृती समितीत केली जाते. यामुळे टाटा समूह आणि संस्थेचे आधीपासूनचे संबंध आहेत.